Maharashtra News : मंत्रालय हे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. त्यामुळे विविध कामांच्या निमित्ताने राज्यभरातील नागरिकांचा ओढा मंत्रालयात येण्याकडे असतो. मात्र मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांकडून अनेक वेळा मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, आंदोलन करणे यांसारख्या घटना घडत असतात.
त्यामुळे या घटनांना तसेच गर्दीला आळा घालण्यासाठी गृहविभागाने आता कठोर उपाययोजना करत सुरक्षेच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार आता नागरिकांना ज्या विभागात काम आहे, त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. मंत्रालय प्रवेशासाठीची प्रवेशपास प्रक्रिया लवकरच ऑनलाइन सुरू करण्यात येणार आहे. वाहनांना देखील अतिशय काटेकोरपणे प्रवेश देण्यात येणार आहे.
उड्या मारण्याचे प्रकार रोखण्यासाठी मजल्यांवर अदृश्य स्टील बॅरियर रोप बसवण्यात येणार आहेत. तसेच १० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात येणार आहे.
सध्या मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरासरी तीन ते साडेतीन हजार अभ्यागत रोज मंत्रालयात येत असतात. कॅबिनेटच्या दिवशी तर रेकॉर्डब्रेक पाच-साडेपाच हजारांपेक्षा जास्तीची गर्दी मंत्रालयात होत असते.