Ahmednagar breaking : श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून मृत व्यक्तीच्याच पत्नी व भावाने केल्याचे समोर आले आहे. बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर असे मृताचे नाव आहे.
मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज असे आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी : दिनांक २५ सप्टेंबर रोजी श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात अनोळखी मयत इसमाचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर याना पथक नेमून तपासाचे आदेश दिले होते.
पोलीस पथकाने घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला. बेवारस मृत इसम हा बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन मयताचे कुटूंबियांकडे विचारपूस केली.
यावेळी मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. पोलिसांनी खाक्या दाखवताच खरी माहिती समोर आली. बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी यास दारु पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिऊन आईवडील व कुटूंबियांना मारहाण करायचा.
२४ सप्टेंबर रोजी तो दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नी अनिता व मनोजने बाबासाहेब याला दारु जास्त झाल्याने दवाखान्यात जायचे आहे असे सांगून स्विफ्टमध्ये बसवले. रस्त्याने जाताना बाबासाहेब याचा गळा आवळला. ताईत तो मरण पावला.
त्यानंतर नगर दौंड रोडवर रेल्वे ट्रॅक जवळ मृतदेह टाकून त्याची ओळख पटू नये यासाठी त्याच्या तोंडावर गाडीतील सिट कव्हर व पेट्रोल टेकवून पेटवले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी मनोज किशोर गोसावी वय ३६, सौरभ मनोज गोसावी वय २०, अनिता बाबासाहेब ऊर्फ गणेश गोसावी सर्व रा. सुकेवाडी,
ता. संगमनेर यांना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदींच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.