Ahmednagar News : अकोले तालुक्यातील फोपसंडी येथे पर्यटनासाठी गेलेल्या संगमनेर तालुक्यातील कनोली येथील चौघा मित्रा पैकी दोघांचा शुक्रवारी दुपारी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्यावर काल शनिवारी सायंकाळी कनोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील कनोली येथील अभिजीत दत्तू वर्षे ( वय २७), पंकज कमलाकर पाळंदे (वय २७), सिद्धार्थ आणि सिद्धांत वाबळे हे चौघे मित्र दोन दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी कनोली येथून अकोले तालुक्यातील फोपसंडी येथे पर्यटनासाठी गेले होते.
दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हे चार मित्र फोफसंडी गावाजवळ असणाऱ्या पानवठा या ठिकाणी निसर्गाचा आणि धबधब्याचा आनंद लुटत असताना त्यातील पंकज पाळंदे याचा मोबाईल पाण्यात पडला, तो पकडण्यासाठी पंकज धावला असता, पाय घसरून तो पाण्यात पडला.
त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र अभिजीत वर्षे याने प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. सिद्धार्थ आणि सिद्धांत वाबळे यांनी घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिल्यावर बुडालेल्या अभिजीत वर्षे आणि पंकज पाळंदे यांचा शोध सुरू करण्यात आला.
मात्र पाण्याचा प्रवाह आणि पाऊस यामुळे या दोघांना शोधण्यात अडचणी आल्या. मात्र काल शनिवारी दुपारच्या सुमारास त्या दोघांचे मृतदेह मिळून आले. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यावर त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात कनोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यातील अभिजीत वर्पे याचे सहा महिन्यापूर्वी लग्न झालेले असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तर पंकज पाळंदे हा देखील आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो हैदराबाद येथे बँकेत उच्च पदस्थ पदावर कार्यरत होता. दोन दिवसापूर्वीच तो सुट्टीवर आला होता. या दुर्दैवी घटनेने कनोली आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.