Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची कामधेनू आहे. बँकेने नेहमीच जिल्ह्यातील सभासद सहकारी संस्थांना बळकटी दिली असून जिल्ह्यातील साखर कारखानदारीला बँकेने सतत साथ दिली. त्यामुळे जिल्हयातील साखर कारखाने सुस्थितीत आहेत.
सहकारी संस्थांना अडचणीत आणणाऱ्या लोकांना जिल्हा बँकेवर चुकीचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा सल्ला बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व संचालक मंडळाने माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बँकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला उत्तर देताना दिला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना कर्डिले व संचालक मंडळाने सांगितले की, जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बँकेचे कर्ज नियमित फेडत असून त्यांच्याकडे थकबाकी राहत नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्राचा व शेतकऱ्यांचा या कारखान्याने विकासच केलेला आहे.
तथापि जिल्हा बँकेच्या कारभारावर टीका करणाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील सत्ता भोगलेल्या बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा शेतकरी सहकारी सूतगिरणी, राहुरी तालुका सहकारी सूतगिरणी अशा अनेक संस्थांना आ. तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसादराव तनपुरे यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून मोठया प्रमाणावर कर्ज घेतले;
मात्र या संस्थांचा कारभार व्यवस्थित न करता जिल्हा बँकेची थकबाकी केली, आजही त्या संस्थांकडे बँकेची मोठया प्रमाणावर थकबाकी आहे. या त्यांच्या कारभारामुळे या भागातील सामान्य शेतकऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील कामगार व व्यावसायिकांच्या विकासाला खिळ बसलेली आहे.
परिणामी तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा बँकेवर चुकीचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. बँकेचा कारभार पारदर्शी असून बँक नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. बँकेस सातत्याने ऑडीट वर्ग ‘अ राहिलेला आहे.
कोट्यवधींच्या गाड्यांची खरेदी का केली ?
जिल्हा बँकेने दोन गाड्यांची खरेदी केली असली, तरी त्याचा उपयोग हा जिल्ह्यातील शेतकरी हिताकरिता व बँकेचा कारभार पाहण्यासाठीच होत असतो. तनपुरे घराण्याने यापूर्वी कोणकोणत्या गाड्या वापरल्या, कशा वापरल्या हे तालुक्यातील जनतेला माहिती आहेत, असेही कर्डिले व संचालक मंडळाने म्हटले आहे.