Ahmednagar News : कर्नाटकसह राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने येत्या गाळप हंगामात साडेतीन हजार रुपये टन दर देण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दर दिल्यास शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे
यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात साखरेचे दर बाजारात ३६०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल पोहोचला आहे. या वाढीव दराचा लाभ कारखानदारांनी शेतकऱ्यांना, असे आवाहन औताडे यांनी केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात ३५०० ते ३७०० रुपये प्रतिटन दर देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बेळगावशी ऊस दराची स्पर्धा करावी लागणार आहे. तेलंगणामध्ये उसाचे दर मागील तीन ते चार वर्षापासून ३३०० ते ३७०० प्रतिटन आहेत.
किमान याच धर्तीवर नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३५०० रुपये प्रतिटनच्या पुढे दर द्यावा. ऊस झोनबंदी कायदा रद्द झाल्याने जो कारखाना अधिक दर देईल, त्यांना ऊस पुरवठा करावा, असे औताडे यांचे म्हणणे आहे.
यावर्षी जिल्ह्यात तीनशे मिलीमीटर इतके कमी पर्जन्यमान झालेले आहे. उसाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. मागील तीन वर्षे जिल्ह्यात अडीचशे लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होती.
ती निम्म्याहून कमी होऊन यावर्षी शंभर मॅट्रिक टनावर आलेली आहे. जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज असून, २०० ते २२४ लाख मेट्रिक टनाची आवश्यकता आहे. मागील दहा वर्षांपासून संगनमताने प्रतिटन एक हजार रुपये दर शेतकऱ्यांना कमी देण्यात आल्याचा आरोप औताडे यांनी केला आहे.