शिर्डीत मोठा गैरव्यवहार समोर , साईभक्तांना देणगीच्या बनावट पावत्या देऊन पैशांचा अपहार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : साईबाबा हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डीत साई बाबांच्या चरणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. करोडो रुपयांचे दान येथे जमा होते. परंतु आता एक मोठी धक्कादायक बातमी शिर्डीतून आली आहे.

साईचरणी झालेल्या दानात मोठा अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केलाय. साई भक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणूक झाली असून त्या संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झाले होते. दानकक्षात काम करणारा कंत्राटी कर्मचारी निम्म्या रकमेच्या बनावट पावत्या देणगीदारांना देत असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली होती.

साईबाबा संस्थेने चौकशी केली असता ही घटना घडली असल्याचे समोर आले. साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखाधिकारी कैलास खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात दशरथ चासकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

अशी माहिती पोलिस निरीक्षक एस. पी. शिरसाठ यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी आरोपीला अजून कोणाची साथ आहे का? आत्तापर्यंत किती लोकांना बनावट पावत्या देण्यात आल्या? याचा तपास पोलीस करणार आहेत. आता यावर काय कारवाई होते ते समोर येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe