Science News : २५ कोटी वर्षांत नवीन महाखंडाच्या निर्मितीमुळे मानव आणि इतर सस्तन प्राणी नष्ट होतील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. युनायटेड किंगडममधील ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सुपर कॉम्प्युटरद्वारे भविष्यातील हवामान मॉडेल तयार केले असून त्याद्वारे पुढील २५ कोटी वर्षांत जगातील खंड एकत्र येऊन एक मोठा खंड ‘पैंजिया अल्टिमा’ तयार होईल.
या महाखंडाच्या एकीकरणातून अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान तयार होईल. संशोधकांनी महाखंडासाठी तापमान, वारा, पाऊस आणि आर्द्रता यांचे अनुकरण करण्यासोबतच कार्बन डायऑक्साईडची पातळी, टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल, सागरी रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे मॉडेल वापरले आहे.

त्यानुसार महाखंडाच्या निर्मितीमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन कार्बन डायऑक्साईड वातावरणात पसरेल, ज्यामुळे पृथ्वीच्या तापमानातही विलक्षण वाढ होऊन ते मानव व इतर सस्तन प्राणांच्या विनाशास कारणीभूत ठरतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
यासंबंधीचा शोधनिबंध ‘नेचर जिओसायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार पृथ्वीचे तपमान ४० ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत राहील,
जे दिवसाच्या कालावधीत आणखी वाढल्याने मानव शरीर घामाने थंड ठेवू शकणार नाही, त्यामुळे मानवजात कालांतराने नामशेष होईल. तसेच वाढत्या उष्णतेमुळे अन्न किंवा पाणी राहणार नाही, ज्यामुळे पृथ्वीवरील जीव नष्ट होतील.