Ujjwala Yojana : ऐन दिवाळीच्या तोंडावर खुशखबर आली आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या कोट्यवधी लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आता या योजनेतील अनुदानात वाढ केली आहे.
आता या योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 600 रुपयांत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
* अशा असतील किमती
केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. दिल्लीतील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 603 रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहे. मुंबईत 602 रुपये, कोलकातामध्ये 629 रुपये आणि चेन्नईत 618.50 रुपयांना गॅस सिलिंडर मिळेल.
* अनुदानात वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलिंडरमध्ये २०० रुपयांची कपात केली होती. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपये करण्यात आली.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला. परंतु आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवळ 600 रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहे अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
* कोट्यवधी कुटुंबांना फायदा
सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे सुमारे 9.6 कोटी लाभार्थी आहेत. म्हणजेच आजच्या निर्णयाचा थेट फायदा देशातील 9.6 कोटी जनतेला अनुदानवाढीचा होणार आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार गरीब लोकांना सवलतीच्या दरात एलपीजी सिलिंडर पुरवते.