Ahmednagar Market : धार्मिक मान्यतांनुसार पूर्वजांच्या नाराजीमुळे घराच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्ध केले जाते. पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवड्यास प्रारंभ झाला आहे. पितृपक्षात पितरांचे स्मरण करण्याची व दान करण्याची परंपरा आहे.
हिंदू धर्मात या दोन दिवसांचे विशेष महत्व आहे. पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्या, वस्तू तसेच किराणा वस्तूही महाग झाल्या आहेत. पिंडदान, खीरदान तसेच ब्राम्हण भोजन आदी कर्मे केल्याने पितरांचा आशिर्वाद मिळतो, अशी पारंपारिक श्रद्धा असल्याने भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात घरोघरी श्राद्धकर्म करण्याची प्रथा आहे.

खीर व उडीदवडा हा पितरांचा प्रमुख नैवद्य असून, काक स्पर्शाच्या रुपाने तो पितरांना दिला जातो. या १५ दिवसांत घरात शुभकार्य तसेच कोणत्याही नव्या कार्याला सुरुवात केली जात नाही.
या काळात फक्त पितरांचे स्मरण करावे, असे मानले जाते. या पंधरवड्यात तीन पिढ्यांचे म्हणजे वडील, आजोबा व पणजोबा यांचे श्राद्ध करतात. त्यानिमित्ताने त्यांच्या नावाने दानधर्म होतो. हा काळ पितरांच्या स्मरणाचा असल्याने या काळात शक्यतो लग्न, मुंज, वास्तुपूजन, पर्यटन आदी कामे करू नयेत.
भाजीपाल्याचे दर कडाडले
पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर नैवद्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वधारले आहेत,
पितृपक्षात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून एक स्वतंत्र भाजी बनविण्यात येते. शिवाय कारले, भेंडी, मेथी, गवार आदी भाज्यांनादेखील मागणी वाढली आहे. फुलांची मागणी मात्र कमी झाली आहे. पितृपक्षामुळे १५ दिवस भाज्यांची दरवाढ अशीच राहील, असे विक्रेते सांगतात.













