देशी गायींच्या जतनासाठी राज्यात सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्रीबीजे प्रयोगशाळेत फलित करून सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे.

देशी गायी आणि म्हशींचे जतन व संवर्धन करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

विखे-पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या विभागांत या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापना होणार आहेत. तसेच या प्रयोगशाळेतून मोबाईल वाहनाच्या माध्यमातून ही सेवा थेट शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत देण्यात येणार आहे.

एका उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींपासून ५० ते ६० उच्च उत्पादन क्षमता असणारी वासरे उपलब्ध होतील. या तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून उच्च दूध उत्पादन व प्रजनन आनुवंशिकता असलेल्या निवडक देशी जातींच्या गायी आणि म्हशींचे प्रजनन करून त्यांचा प्रसार होण्यास मदत होईल.

तसेच नामशेष होत असलेल्या प्रजातींची संख्या कमीत कमी कालावधीत वाढवून या प्रजातींचे संवर्धन करता येईल. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उच्च प्रतीच्या वळूची निर्मिती करून असे वळू गोठीत विर्यमात्रा निर्मिती प्रयोगशाळेमध्ये विर्य संकलनासाठी व कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी वापर करता येतील. गायी-म्हशींची उत्पादन क्षमता वाढल्यावर शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीस मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe