Ahmednagar Breaking : बापाच्या डोक्यात लाकूड टाकून खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या मुलास येथील न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
अकोले तालुक्यातील वारंघुशीजवळील बोरवाडी येथे राहणारा काळू रामदास घाणे याने आपले वडील रामदास लक्ष्मण घाणे यांच्याकडे पैसे मागितले होते.

तीन शेळ्या आणि दोन बोकड विकले, त्याचे पैसे काय केले? असे मुलगा काळू यास वडील रामदास यांनी विचारले असता त्याचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डोक्यात लाकूड टाकून खून केला.
कुणाला काही संशय येऊ नये म्हणून त्याने पुरावाही नष्ट केला होता. याबाबत २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मयताचा मुलगा राजू घाणे यांनी राजुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी काळू घाणे याच्या विरोधात खुन, पुरावा नष्ट करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.
त्याला पोलिसांनी अटकही केली होती. यानंतर संगमनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्या समोर झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील भानुदास कोल्हे यांनी पाच साक्षीदार तपासले.
फिर्यादी राजू घाणे व त्याची आई या दोघांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील कोल्हे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी या प्रकरणातील आरोपी काळू घाणे यास दोषी ठरविले.
खुनाच्या कलमाखाली जन्मठेप व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच पुरावा नष्ट केल्याच्या कलमाखाली ३ वर्ष सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.