Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामीण भागात गणेशोत्सव काळात झालेल्या पावसानंतर नवरात्रोत्सवापूर्वीच ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरुवात झाली असून, वाढत्या उकाडयाने नागरिक हैराण होत आहेत. ऑक्टोबर हीटचा चटका गेल्या तीन- चार दिवसांपासून सहन करावा लागत आहे.
उन्हाळ्याप्रमाणे यंदा पावसाळ्यातही उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. पावसाने उसंत घेतल्याने उकाड्यात वाढ झाली असून, कमालसह किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीदेखील गरम होत आहे,
दुपारी रखरखत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे.तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माघारी परतणाऱ्या पावसाने सप्टेंबरमधील तापमानाची तीव्रता काहीशी कमी केली होती.
मात्र, आता ऑक्टोबर हीटचा तडाखा बसू लागला आहे. ऑक्टोबर महिना हा ऋतू संक्रमणाचा काळ असतो. नैऋत्य दिशेने येणाऱ्या मोसमी वाऱ्यांची दिशा बदलून ते आग्नेय दिशेने म्हणजे जमिनीकडून वाहायला सुरुवात होते.
जमिनीवरून येणारे वारे सोबत उष्णता घेऊन येतात, त्यामुळे या दिवसांत तापमान अधिक वाढते. उष्ण, दमट वातावरणामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. फॅन, कुलर, एसीचा वापर वाढल्याने वीज खर्चात वाढ होते.
पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत असल्याने जमिनीतील ओलावा व प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे. खरीप व रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. वाढत्या उष्म्याच्या कारणाने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून,
भरपूर पाणी प्याल्याने घाम व लघवीद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते म्हणून अशा उष्ण हवामानत भरपूर पाणी पिण्याचा व धूळ, प्रदूषित वातावरणात जाणे टाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.