Maharashtra News : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना (शिंदे) आणि ठाकरे गट या दोन्हींकडून शिवाजी पार्कसाठी अर्ज करण्यात आले होते.
अखेर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने अटीशर्तीनुसार शिवसेना ठाकरे गटाला रितसर परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क मैदान हे अतूट नाते असून गेल्या ५६ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. शिवाजी पार्क मैदानात होणारा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते.
यावर्षी दोन्ही गटांनी अर्ज केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. शिवसेना (शिंदे) गटाने अर्ज मागे घेतल्याने पालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
या नियमांचे पालन बंधनकारक!
■ सभेला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असेल
■ कार्यक्रम संपल्यावर मैदान स्वच्छ व पूर्ववत ठेवावे
■ मैदानाचे नुकसान, गैरवापर, अटीशर्तीचे उल्लंघन केल्यास २० हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल
अशा राहणार अटीशर्ती
■ दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ५०० रुपयांच्या शुल्कासह २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटीशर्तीचे पालनही करावे लागणार असल्याचे परवानगीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
■मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल इंजिनीयरचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
शिवसेनेचा (ठाकरे) टीझर रिलीज
टीझरमध्ये ‘एक पक्ष, एक नेता आणि एक विचार’ असे ठणकावण्यात येत आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे भाषण करतानाचे फोटो आहेत. बाळासाहेबांकडून आदित्य ठाकरे यांना तलवार दिल्याच्या फोटोसह शिवसेना पक्षाच्या वाघाचा फोटो व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.