Jayakwadi Dam : तोपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये ! अहमदनगर जिल्ह्यातील हे आमदार आक्रमक

Published on -

Jayakwadi Dam : मेंढेगिरी समितीच्या कालबाह्य झालेल्या सन २०१४च्या आदेशाची अंमलबजावणी न करता जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेरनिर्णय येत नाही, तोपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये,

अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी आपण आमदारांची मोट बांधणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

नगर- नाशिकच्या धरणातून समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या विचाराधीन आहे. त्याबाबत पुढील आठवड्यात (दि. १७ रोजी) समन्यायी पाणी वाटप समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

त्या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी त्यांच्यासह उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख,

माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपराव बनकर, आमदार लहू कानडे आदी नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन चर्चा करावी व त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा. याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे.

आ. काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव, निफाड, येवला, सिन्नर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे व शेती सिंचनाचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या नगर,

नाशिकच्या धरणांतून समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडी धरणात प्राधिकरणाच्या २०१४ च्या निर्णयाच्या आधारे पाणी सोडण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समजली आहे.

तत्पूर्वी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील तसेच इतर धरण क्षेत्रातातील नगर, नाशिक जिल्ह्यातील आमदारांसमवेत बैठक घ्यावी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या नव्या निकषांची अंमलबजावणी केल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ नये.

याबाबत सर्वप्रथम कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या सभासदांमार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे आ. काळे यांनी म्हटले आहे.

मागील दोन ते तीन वर्षे नगर, नाशिक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी मुबलक होते; परंतु यावर्षी अपेक्ष पर्जन्यमान न झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. परतीच्या पावसाकडून अपेक्षा होती;

मात्र तीदेखील फोल ठरलेली आहे. अशा परिस्थितीत जर धरणातून खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला तर पाण्याची नासाडी तर होणारच आहे;

परंतु भविष्यात पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. आजवर खूप सोसले, यापुढे सोसण्याची हिंमत राहिली नसून आजवर झालेला अन्याय यापुढे होणार नाही, यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नगर, नाशिक जिल्ह्यातील आमदारांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News