ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! पहिल्याच दिवशी वेबसाइट बंद

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी काल सोमवारपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

त्यामुळे पहिल्याच दिवशीच संकेतस्थळ बंद असल्याने इच्छुकांची निराशा झाली. त्यामुळे आता निवडणुका आयोगाने आता ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.

महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडत असतानाच आता २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची धुरळा उडणार आहे.

याबाबत कोल्हे पुढे म्हणाल्या, राज्य निवडणूक आयोगाकडून मागील अनेक वर्षे ग्रामपंचायती निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतचा गावगाडा प्रशासकाच्या हातात दिला आहे. परंतु, प्रशासकाला त्याचे दैनंदिन कामकाज करून ग्रामपंचायतचे कामकाज करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले.

अशा परिस्थितीत निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या या भूमिकेबद्दल ग्रामस्थांतून तीव्र नाराजीला सामोरे जात असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

त्यामध्ये कोपरगाव कुंभारी, घोयेगाव, ब्राह्मणगाव, वारी, कान्हेगाव, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर या १७ तर राहाता तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, पुणतांबा- रस्तापूर या ४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी १६ ते २० या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. हा कालावधी कमी असल्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार अर्ज संकेतस्थळावर भरण्यासाठी गर्दी करून आहेत. मात्र, हे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुकांची सध्या काल सोमवारी पहिल्याच दिवशी निराशा झाली.

■ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा द्यावी, जेणेकरून इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही.- स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

■संकेतस्थळ बंद असल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. मुदतवाढ वगैरे काही निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. – संदीप भोसले, तहसीलदार

■उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा कालावधी कमी असल्यामुळे वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी • आम्ही सकाळपासून ऑनलाइन सेंटरवर थांबलो आहे. हे संकेतस्थळ सुरू नसल्यामुळे आम्हाला उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe