ST Karmachari News : अवघ्या महिनाभरावर तेजोमय असा दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटले की खासगी, शासकीय लहान-मोठ्या सर्वच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो.
यंदा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे. कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये एवढा बोनस, १२ हजार ५०० अग्रीम रक्कम आणि वेतन यंदाच्या ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पगारात मिळणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत आर्थिक तडजोड करावी लागणार नसल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.९ नोव्हेंबर रोजी सर्वत्र दिवाळी सणाला सुरुवात होत आहे.
या दिवसात सर्वत्र आनंदोत्सव असतो. नवीन कपडे, नवीन वस्तू, फराळ यांसह दागिने, वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र बोनस कमी मिळाला अथवा वेतन उशिरा मिळाले तर कर्मचाऱ्यांचा हिरमोड होतो.
एसटी कर्मचाऱ्यांनादेखील अनेक वेळा अशा हिरमोड होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागले. मात्र यंदा एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस, १२ हजार ५०० रुपये अग्रीम रक्कम आणि वेतन एकत्रित दिले जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्वी होणाऱ्या या बोनस आणि वेतनामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.