Ahmednagar Breaking : कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात सप्तशृंगी माता मंदिराजवळ संशयावरून काकाने आपल्याच पुतणीचा कुन्हाडीने घाव घालून खून केला.
बुधवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा संदीप कांबळे (वय २१) असे मयत तरुणीचे नाव आहे. बुधवारी रात्री उशिरा येथील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडताच शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत तात्काळ आरोपी संतोष हरीभाऊ आरणे (वय २६) याला ताब्यात घेतले. मयत तरुणी नेहा ही बाथरूमला जाते म्हणून बाहेर येऊन एका तरुणासोबत रात्रीच्या सुमारास अंधारात उभी राहून बोलत होती.
दरम्यान तिचा काका आरोपी संतोष याने हे पाहिले. त्याने मयत पुतणी स्नेहा हिच्यावर संशय घेऊन तिच्या वागण्याचा राग आल्याने त्याने पुतणीला बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने तिच्या पायावर, अंगावर वार करून संपवले.
या घटनेबाबत मयत तरुणीची आई ज्योती नंदकिशोर आरणे ( वय ४६ ) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काकाच्या हल्ल्यात स्नेहा जबर जखमी झाली होती.
तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पुढील तपास करीत आहेत.