Ahmednagar News : शिर्डी राहुरी शनी शिंगणापूर रस्त्यावर असणाऱ्या नगर- मनमाड महामार्गावरील शिंगणापूर (सोनई) फाटा येथे काही लटकू शनी भक्तांच्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना शिंगणापूर येथील दुकानवरून साहीत्य घेण्यास सांगतात.
याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना समजताच त्यांनी तात्काळ या लटकूंची दखल घेऊन धडक मोहीम राबविली. सर्व ‘लटकू’ दलालांवर कायदेशीर कारवाई केली. लटकूंचा भाविकांना कुठलाही त्रास होणार नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
राहुरी, शिंगणापूर फाटा, उंबरे, ब्राम्हणी ते सोनई दरम्यान मोठ्या प्रमाणात लटकू दलालांचा सुळसुळाट आहे. शिर्डीहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना शिंगणापूर फाटा या परिसरात गाड्याला हात करून त्यांना आमच्या दुकानावर शिंगणापूर येथे साहित्य खरेदीसाठी चला तुम्हाला दोनशे ते चारशे रुपये देतो,असे वाहन चालकाला विनवणी केली जाते.
वाहन चालक नविन असल्यामुळे हे लटकू या वाहनांचा वेगाने पाठलागही करतात. पाठलाग करताना अनेक वेळा या परिसरामध्ये या लटकूंचे अपघात झाल्याने अनेक तरुणांचा जीवही गमावला आहे. शिर्डीहून आलेला प्रत्येक भाविक शिंगणापूरला जात असतो.त्यामुळे या रस्त्यावर मोठी रहदारी असते.
तसेच शालेय विद्यार्थी, राहुरी विद्यापीठातील अनेक कर्मचाऱ्यांची रहदारी असते. राहुरी ते शिंगणापूर फाट्यावर या लटकूच्या २५ ते ३० मोटरसायकली सावजाच्या शोधात उभ्या असतात,
राहुरी पोलिसांनी लटकूंचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम चालू असून नुकतच पो. कॉ. गायकवाड यांनी लटकूंचा बंदोबस्त करण्यासाठी महेश कदम व राम काते दोघे रा. सोनई या दोन लटकुना पाठलाग करून पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
यापुढे या रस्त्याला रस्त्यावर कोणी लटकू आढळल्यास ग्रामस्थांनी पोलिसांची संपर्क करावा, कुठल्याही भाविकांना याचा त्रास होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केली आहे.