Ahmadnagar Breaking : तुम्ही देवीच्या पालखीसमोर नाचायचे नाही, तुमच्या समाज मंदिरासमोर जाऊन काय करायचे ते करा, असे म्हणत विकास गौतम जोगदंड यांच्यासह इतर पाच जणांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत
जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात विकास गौतम जोगदंड (वय ३८), यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील चंद्रकांत घोलप, महादू पांडुरंग घोलप, वसंत पांडुरंग घोलप, विशाल शिवाजी घोलप, अविनाश शिवाजी घोलप, शिवाजी मुरलीधर घोलप, विजय अंबादास घोलप सर्व रा. अनगरे, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (दि. २५) रोजी फिर्यादी यांच्यासह मनोहर जोगदंड, गौतम गुलाबराव जोगदंड, दत्तु दादा जोगदंड, विकास गौतम जोगदंड, राजु दादा जोगदंड सर्व रा. अनगरे, हे देवीच्या पालखीसमोर नाचत असताना विशाल घोलप व अविनाश घोलप यांनी तुम्ही आमच्या देवीच्या पालखीसमोर नाचायचे नाही,
तुम्ही तुमच्या समाज मंदिरासमोर जाऊन काय करायचे ते करा, असे म्हणत निखील चंद्रकांत घोलप याने कमरेचा पट्टा काढून राजु मनोहर जोगदंड याच्या पाठीत मारहाण केली.
तसेच अविनाश शिवाजी घोलप याने तेथे पडलेली काच हातात घेऊन फिर्यादीच्या बोटावर मारुन दुखापत केली आहे. तसेच इतर जणांनी फिर्यादी आणि इतरांना शिवीगाळी करुन खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे करत आहेत.