Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. सोबतच पगारापोटी साडेबारा हजार रुपयांचा ॲडव्हान्स देखील दिला जाणार आहे.
त्यामुळे यंदाची दिवाळी मनपा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत गोड असणार आहे. हा निर्णय शुक्रवारी (दि.२७) महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.
महापौर शेंडगे म्हणाल्या की, कामगार संघटनेने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व थकबाकी देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात कामगार संघटनेचे पदाधिकारी, प्रशासन व पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
दिवाळी गोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी अॅडव्हान्स मिळणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळावी, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
या बैठकीवेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस अनंत वायकर, अतिरिक्त आयुक्त प्रदिप पठारे आदींसह अधिकारी उपस्थित होते.