Maharashtra News : राज्यासह प्रत्येक गावात आता मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला असून, आरक्षणासाठी २५ तारखेपासून पुन्हा उपोषणास बसलेले मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी
तसेच आरक्षणाकडे नेतेमंडळींकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आता प्रत्येक गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचे फ्लेक्स लावले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे ग्रामपंचायतने ठराव घेऊन सर्व पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे.
शनिवारी निंबोडी, ता. पाथर्डी येथील ग्रामस्थांनीदेखील जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवत नगर – पाथर्डी महामार्गावरील निंबोडी फाटा, या ठिकाणी सायंकाळी महामार्ग रोखून धरत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
या वेळी जय जिजाऊ जय शिवराय, जरांगे पाटील तुम आगे बढो, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्याचबरोबर भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, मिरी, आदी गावांमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावबंदी करण्यात येत असल्याचे फ्लेक्स चौकात लावण्यात आले आहेत.
घाटशिरस येथे ग्रामपंचायतने केलेल्या ठरावावर सरपंच गणेश पालवे, उपसरपंच अलका चोथे, प्रकाश माळी, वच्छलाबाई पालवे, द्वारकाबाई शिरसाठ, महेश वाघमारे, हिम्मत पडोळे, आसराबाई पाठक, अलका पडोळे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निंबोडी फाटा, या ठिकाणीदेखील सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते.