Parner News : पारनेर तालुक्यातील जातेगाव परिसरात यावर्षी दमदार पाऊस न झाल्याने या भागातील पिके सध्या पाण्याअभावी जळू लागली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत.
यावर्षी सुपा व वडनेर, या भागात ऑगस्ट व सप्टेंबर चांगला पाऊस झाला; परंतु जातेगाव, गटेवाडी, घाणेगाव, राळेगण सिद्धी, पळवे खु, पळवे बु., नारायण गव्हाण, या भागात पाऊस अत्यप आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात होते; यावर्षी जून – जुलैमध्ये अजिबात पाऊस झाला नाही. ऑगस्टमध्येही अत्यल्प पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवात काही भागात चांगला पाउस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, पळवे खु., पळवे बु., नारायणगव्हाण, राळेगण सिद्धी, म्हसणे, या गावामध्ये पाऊस झाला; पण अत्यल्प झाला. नदी- नाल्यांना पाणी वाहिले नाही, त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस होईल, या आशेवर कांद्याची लागवड व ज्वारीची पेरणी केली.
पीक जोमदार आले; परंतू सध्या ही पिके पाण्याअभावी जळू लागली असून, पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस नाही झाला तर पिके जळून जातील, अशी परिस्थिती आहे.
ज्वारीचे पीक जळून गेल्यास दुग्धव्यवसाय अडणीत येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने जनावरांसाठी चाराडेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.