दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले ! आता दिवाळीत चांगला भाव मिळेल हीच आशा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural News : दसरा, दिवाळी गोड होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या मातीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.

दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड होण्याची शक्यता कमीच आहे.

दसऱ्याला घर, बंगला ते लहान मोठी दुकाने, शोरूम, वाहनांना झेंडू फुलांची तोरणे लावतात. नवरात्रीत देवदेवतांच्या प्रतिमा, मुर्तीनांही याच फुलांचे हार घालतात. त्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला झेंडूला मोठी मागणी असते.

ही बाब हेरून दरवर्षी अनेक शेतकरी झेंडू फुलांची लागवड करतात. सणासुदीला दोन पैसे जास्त हाती येतील, दसरा आनंदात साजरा करता येईल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, इतर पिकांप्रमाणेच झेंडूनेदेखील यंदा निराशा केली.

मातीमोल भावाने फुले विकावी लागली. शेवटी झेंडूची फुले घरी नेऊनही त्याचा काहीच फायदा नसल्याने विक्रेत्यांनी तो जागीच टाकून काढता पाय घेतला. अनेकांनी तो कचऱ्यात फेकून दिला. अपुऱ्या पावसाने मालाचा दर्जा घसरला आवक वाढल्याने भावही घसरल्यामुळे यंदा झेंडूनेदेखील निराशाच केली.

अनेक शेतकऱ्यांचा फुले घेऊन येण्याचा वाहनाचा खर्चही वसूल झाला नाही, तर काहींना येण्याजाण्याचा खर्च भागून दोन दिवस जेवणाचा खर्च भागेल एवढेच उत्पन्न झेंडू फुले विक्रीतून मिळाले. त्यामुळे ते निराश झाले. शेतकऱ्यांना आता दिवाळीत झेंडू फुलांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.