Maharashtra News : महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकरी वैतागले असून पाणी असून पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात शेतकरी आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
यावर्षी तसा पाऊस असून नसल्यागत आहे. बहुतेक ठिकाणी पाऊसच नाही. त्यामुळे पिके नसल्याने त्याठिकाणी विजेची मागणी कमी असूनही महावितरणकडून शेतकऱ्यांना भारनियमनाचे झटके दिले जात असल्याने शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
वीज गेल्यानंतर कधी येईल याचा भरवसा नाही. अशी शेतकऱ्यांची होरपळ महावितरणकडून चालू असल्याने आंधळं दळतंय अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
आधीच आठ तास वीज, त्यात तीन तासांचे भारनियमन, त्यामुळे दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
रात्रीची लाईट आठ वाजता येऊन पहाटे चार वाजता जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दयायचे कसे ? रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार असल्याने रात्री शेतकरी जीव मुठीत धरून शेतीत जातात. त्यामुळे या बळीराजाला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवणाऱ्या शेतकरी संघटना मात्र शेतकऱ्यांच्या या खरोखरच जीवन मरणाच्या असलेल्या प्रश्नावर गप्प का? इतर वेळी आवाज उठवणाऱ्या शेतकरी नेत्यांनी या विजेच्या प्रश्नावरसुद्धा आवाज उठवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.