खा. हेमंत गोडसे यांचा पदत्याग ! पक्षप्रमुखांकडे खासदारकीचा राजीनामा सादर

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात लोकप्रतिनिधी टार्गेट होऊ लागल्याने राजीनामा सत्र सुरू झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी आरक्षणासाठी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सादर करत पदत्याग करण्याची भूमिका घेतली आहे.

खा. गोडसे यांनी सोमवारी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या उपोषणस्थळी भेट दिली. मात्र त्यांना तेथील उपस्थित कार्यकर्ते आणि उपोषणकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी लगेचच राजीनाम्याची भूमिका घेतली.

खा. गोडसे यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे की, आरक्षण नसल्याने शिक्षण आणि नोकऱ्या मिळण्यासाठी मराठा समाजातील मुलांची कुचंबना होत आहे. गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्याने विद्यार्थी प्रगतीपासून वंचित राहत आहेत.

चार वर्षांपूर्वी समाजाच्या वतीने अवघ्या राज्यभर शांततामय मूकमोर्चे काढत आरक्षणाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतर आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अगदी काही दिवसांतच न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण बाद झाले.

दिलेल्या मुदतीत शासनाकडून आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी तीव्र भावना निर्माण झाल्याचे खा. गोडसे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe