Ahmednagar News : राहात्यात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी एस. टी बसेसवर असणाऱ्या शासकीय जाहिरात फलकावरील पंतप्रधान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर नेत्यांच्या फोटोला काळे फासले. तसेच जोडे मारुन या सरकारचा निषेध नोंदवला.
मराठा आरक्षण प्रश्न त्वरित मार्गी लावा. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे केले जाईल. भविष्यातील आंदोलन सरकारला झेपणार नाही. मराठा समाज बांधव सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मोहनराव सदाफळ यांनी दिला.

सोमवार दि. ३० रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहाता शहरातील व तालुक्यातील मराठा समाज बांधव ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरासमोर एकत्रित जमा झाले. त्यानंतर पायी बस स्थानककडे चालत गेले. जाताना महामार्गावर दिसेल त्या एसटीला थांबवत एसटी वरील जाहिरात फलकावर असणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमांला काळे फासले. त्या फ्लेक्सवर जोडे मारले.
गेल्या पाच दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी वसलेले आहे. सरकारने मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये अन्यथा सरकारला खूप जड जाईल. आम्हाला कुणाच्याही हक्काचं अथवा कुणाच्याही वाट्यातून आरक्षण नकोय तर जरांगे पाटलांची मागणी मान्य करत स्वतंत्र आरक्षण लवकर द्या आणि हा प्रश्न कायमचा मार्गी लावा.
जर प्रश्न मार्गी लागला नाही तर सबंध राज्यभरात तसेच राहाता तालुक्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून मराठा समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी मराठा समाज बांधवांनी दिला.
आंदोलनादरम्यान राहाता शहरातील समाज बांधवांच्या वतीने अत्यंत शांततेत व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली. मोहनराव सदाफळ, भाऊसाहेब सदाफळ, सागर सदाफळ, सागर बोठे, पंकज शिंदे, प्रल्हाद चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन बंद शंभर टक्के यशस्वी केला. तालुक्यातील अस्तगाव, लोणी, शिर्डी, राहता, केळवड, साकुरी यासह अनेक गावांनी कडकडीत बंद पाळून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.