Success Story : पारस डेअरी प्रोडक्ट दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या 200 ते 300 किमी परिसरात खूप प्रसिद्ध आहेत. दूध आणि तूपाचा हा ब्रँड घराघरांत प्रसिद्ध करण्यासाठी त्याचे संस्थापक वेद राम नागर यांना खूप मेहनत घ्यावी लागली.
वेद राम नागर हे नाव लोकांना कमी माहिती असेल, पण त्यांचा पारस ब्रँड सहज ओळखला जातो. आज पारस डेअरी दररोज सुमारे 36 लाख लिटर दुधाची विक्री करते. इतकंच नाही तर पारस डेअरी प्रोडक्ट हे अमूलला डेअरी प्रॉडक्टला देखील मार्केटमध्ये जोरदार टक्कर देत आहे. पण पारसची सुरवात कशी झाली ? त्याची यशोगाथा काय आहे ? हे फार कमी लोकांना माहित आहे. जाणून घेऊयात याबद्दल –
60 लिटर दूध विक्रीपासून सुरवात
पारस डेअरीने केवळ 60 लिटर दुधाची विक्री करून सुरवात केली. याचे संस्थापक वेद राम नागर यांनी वयाच्या 27 व्या वर्षी दूधवाले म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1960 च्या दशकात ते कडाक्याच्या थंडीत ते सायकलवरून दूध विकत असत. पण काम करताना त्यांचा हेतू , इरादा मोठा होता. आज मेहनतीच्या जोरावर त्यांनी हजारो कोटींचा पारस ब्रँड तयार केला आहे. 20 वर्षे दूध विकल्यानंतर त्यांनी 1980 मध्ये एक फर्म सुरू केली.
1987 मध्ये साहिबाबादमध्ये दूध प्रकल्पास सुरवात
1984 मध्ये वेद राम नगर यांनी दूध आणि त्यापासून उत्पादने तयार करण्याचे युनिट सुरू केले. 1986 मध्ये वेद राम नागर यांनी व्हीआरएस फूड नावाची कंपनी स्थापन केली. 1987 मध्ये साहिबाबाद येथे मिल्क प्लांट सुरू झाला. 1992 मध्ये बुलंदशहरमधील गुलावठी येथे दुसरा प्रकल्प सुरू करण्यात आला.
काही वर्षांनंतर कंपनीने आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि 2004 मध्ये कंपनीने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आपला व्यवसाय विस्तारला आणि येथेही दूध कारखाना सुरू केला. 2005 मध्ये वेद राम नागर यांचे निधन झाले.
2008 मध्ये त्यांच्या कंपनीचे नाव बदलून वेद राम अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड करण्यात आले. आज ही कंपनी यूपीसोबतच मध्य प्रदेशातही व्यवसाय करत आहे. त्यांची कंपनी दररोज 36 लाख लिटर दुधाची विक्री करते. आज वेद राम नागर यांची मुले हेल्थकेअर आणि रिअल इस्टेटमध्येही मोठे नाव कमावत आहे.