Pathardi News : विज बिल थकल्याने पाथर्डी शेवगाव जायकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचा विजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. शहरांमध्ये ऐन सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.
शहराला कोणी वाली आहे की नाही अशी स्थिती पालिकेच्या कारभारावरून निर्माण झाली आहे.
पाथर्डीसह ग्रामीण भागातील २५ गावे या योजनेवर जोडलेली आहेत. चार ते सहा दिवसातून एक वेळा म्हणजे महिन्यातून चार ते सहा वेळा फक्त नळावाटे पाणी मिळते. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घराघरात पाण्याची गरज वाढलेली आहे.
घरगुती बोअर पंप समाधानकारक पावसाअभावी कमी पडत चालले आहेत. पाणी मिळवायचे कुठून असा प्रश्न लोकांपुढे पडला आहे. शहरातील ज्या भागांचे आवर्तन गेल्या तीन दिवसांपासून होणार होते, त्या भागाला आता पाणी न मिळण्याचा आजचा आठवा दिवस आहे.
दूर अंतरावरील हातपंप, पाण्याचे जार व सांडपाण्यासाठी रिक्षामधून विकतचे पाणी घेण्याची लोकांवर वेळ आली आहे. पालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असून लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार मोनिका राजळे यांचा धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो.
पालिकेचे पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असून काही भागातील पथ दिव्यांवरील विजेचे दिवे कमकुवत झाले आहेत. ऐन दीपोत्सवा दरम्यान शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी येथे राहत नसल्याने उपलब्ध व कार्यालयात उपस्थित कर्मचारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देतात. गावामध्ये सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले असून कचरा गोळा करणारी पालिकेची वाहने दुपारच्या फेरीमध्ये निव्वळ कागदोपत्री फेरी मारतात.
मिनिटभरही थांबत नसल्याने दुकानदारांना कचरा टाकण्यासाठी कुठली जागा नसल्याने बहुसंख्य व्यावसायिक रस्त्यावर कचरा टाकतात. घाण, दुर्गंधी, रात्रीचा अंधार व पाण्याची टंचाई अशा वातावरणातही नागरिक तोंड मारून निमुटपणे जीवन जगत आहेत.
ग्रामीण व शहरी भागाचा वीजपुरवठा एकत्रित असून पालिकेचे हप्ते फारसे थकत नाहीत. मात्र ग्रामीण भाग बिल भरीत नसल्याने तो वाढीव बोजा दिसतो. पालिकेला स्वतंत्र वीज कनेक्शन द्यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी वीज वितरण कंपनीकडून पूर्ण केली जात नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे.
नियमित पाणीपट्टी भरूनही वर्षांतून अवघे दीडशे दिवस नागरिकांना पाणी मिळते, यामध्ये बदल होणार की नाही असा नागरिकांचा प्रश्न आहे. नवीन पाणी योजनेचे भूत उभे करण्यापेक्षा आहे ती पाणी योजना व्यवस्थित चालवा, अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.
तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कुठल्याही क्षणी संतप्त नागरिकांचे उग्र आंदोलन पालिका कार्यालयात सुरु होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय पुढारी पालिकेच्या दुरावस्थेबाबत चकार शब्द काढत नाहीत. कारण निवडणुका लांबलेल्या आहेत असे उपहासाने नागरिकांकडून बोलले जात आहे.