कोपरगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

त्याबाबत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेवून या ४० तालुक्याबरोबर कोपरगाव तालुका व मतदार संघातील पुणतांबा महसुल मंडलातील गावे देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

कोपरगाव तालुका हा पर्जन्यछायेत येत असल्यामुळे दरवर्षी इतर तालुक्याच्या तुलनेत कमीच पाऊस पडतो. परंतु चालू वर्षी कोपरगाव तालुक्यात दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झालेले आहे.

सलग दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे देखील मोठे नुकसान झालेले असून भू- गर्भाची पातळी खालावली जावून पाण्याचे स्त्रोत देखील आटू लागले आहे.

त्यामुळे आतापासूनच अनेक गावात शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे रब्बी हंगामाचे भवितव्य अधांतरी असून उन्हाळ्यात संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे.

अशी परिस्थिती संपूर्ण कोपरगाव तालुक्याची असतांना एकीकडे कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सिन्नर व येवला तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश केला जातो दुसरीकडे मात्र कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले जाते. हा कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांवर अन्याय आहे.

त्याबाबत कोपरगाव तालुक्याच्या व मतदार संघातील पुणतांबा महसुल मंडलातील दुष्काळाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्यापुढे मांडून कोपरगाव

तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, अशी आग्रही मागणी करणार असून कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या मिळणाऱ्या सोयी सवलती मिळवून देवू व कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe