अहमदनगर ते पुणे प्रवास चारपट महागला ! दिवाळीत गावाला जाताना खिसा रिकामा होणार…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : दिपावली सणानिमित्त शहरात वास्तव्यास असलली नोकरदार मंडळी आपापल्या गावाकडे परततात. कुटुंबियांसोबत सण साजरा करण्यासाठी सर्वजण गावाकडे येतात. यामुळे सहाजिकच वाहनांना गर्दी होते.

या संधीचा लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्स व वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास भाडेवाढ करूनऐन सणा सुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लुट केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथकांची स्थापना करून प्रवाशांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे, अशी मागणी केली जात आहे.

दिवाळी सुट्टीत शहरातून परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर एसटी बसेसच्या संख्येची मर्यादा लक्षात घेता मोठ्या संख्येने प्रवाशी खासगी बसेसने प्रवास करीत असतात.

त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी ऐन दिवाळीत बसेसचे तिकीट दर वाढवले आहेत. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात आहे. दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली असून, लवकरच शाळांनाही सुटी लागणार आहे.

त्यामुळे दिवाळीसाठी आपल्या गावी जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. हा भार एसटी महामंडळाला पेलवत नसल्याने खासरी बसेसचा पर्याच प्रवाशी निवडतात. या संधीचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्स चालक घेतात.

शासन निर्णयाच्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन उपायुक्तांनी दिले आहेत.

सणासुदीच्या, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी ट्रॅव्हर्ल्सकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते, असे असले तरी ट्रॅव्हल्स चालकांच्या दरवाढीकडे आरटीओंचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

नगर ते पुणे प्रवास चारपट महागला असल्याने दिवाळीत गावाला जाताना खिसा रिकामा होणार, हे निश्चित. दिवाळी आणि सुट्टयांच्या हंगामात रेल्वेपाठोपाठ एसटीदेखील फुल्ल होऊ लागल्याने प्रवाशांना खासगी बस सेवेचा आधार घ्यावा लागत आहे.

मात्र, या खासगी बससेवेचे दर दिवाळीचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe