Electric Vehicles: Good or Bad :- सध्या पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढतांना दिसून येत आहे.
विविध दुचाकी तसेच कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली असून ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध देखील केलेली आहेत. ग्राहकांचा कल पाहिला तर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार खरेदीकडे जास्त प्रमाणात कल असल्याचे सध्या दिसून येते.
म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाहनांच्या वापरामुळे सारख्या इंधनांवरील अवलंबित्व कमी होईल व खर्च कमीत कमी मध्ये आपल्याला वाहन वापरता येईल असा प्रामुख्याने समज आहे.
परंतु खरंच इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे म्हणजे पैशांची बचत हे समीकरण बरोबर आहे का? आताचा कालावधी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी योग्य आहे का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ.
इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे योग्य आहे का?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक टू व्हीलर घ्यायची असेल तरी तिची किंमत एक लाख 50 हजार रुपयांच्या आसपास आहे.
2- ही वाहने एकदा फुल चार्ज केल्यानंतर त्यांची रेंज जास्तीत जास्त 110 ते 150 किलोमीटर असते.( यातही वाहनांच्या मॉडेल नुसार बदल होतो.)
3- पेट्रोल मोटरसायकलच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर 60% महाग असते. पेट्रोल गाडी चालवण्याचा प्रति किलोमीटरचा खर्च दोन रुपये येतो.
4- महत्वाचे म्हणजे या दुचाकी करिता मोजलेली जी काही जास्तीची रक्कम असते ती वसूल करण्याकरिता पाच वर्षाचा कालावधी लागून जातो.
5- तसेच ही इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अजून देखील मर्यादित आहेत. यांचे रिसेल व्हॅल्यू सध्या तरी बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाही.
6- या वाहनांचा जो काही वारंटी पिरेड असतो त्यानंतर बॅटरी किंवा चार्जर खराब झाल्यास त्यासाठी किती पैसे लागणार याबाबत अजून देखील स्पष्टता नाही.
7- या वाहनाच्या मदतीने तुम्हाला दूरवरचा प्रवास करायचा असेल तर त्यावर मर्यादा आहेत. कारण पेट्रोल पंप सारखे याच्या सर्वत्र चार्जिंगच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
8- सध्या अनेक इलेक्ट्रिक कार देखील बाजारात उपलब्ध आहेत.परंतु पारंपारिक कारच्या तुलनेत किमतीमध्ये दुपटीचा फरक आहे.
9- जर या कारची बॅटरी खराब झाली तर कारच्या किमतीच्या अर्धी किंमत बॅटरी चीच असते.
10- या कार साठी अतिरिक्त भरलेली किंमत किंवा द्यावा लागणारा प्रीमियम वसूल होण्यासाठी सहा वर्षाचा कालावधी लागतो.
11- इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी कंपनी रेंजच्या बाबतीत जो काही क्लेम करते त्याऐवजी मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर मिळणारी रेंज यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते.
12- तुम्हाला जर कुठे लांब ड्राइव्हला जायचे असेल किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणाला देखील जायचे असेल तर त्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा आहे की नाही याचा अगोदर विचार करावा लागतो.
या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून सध्या तरी इलेक्ट्रिक वाहन घेणे परवडण्यासारखे नाही किंवा हा पर्याय अजून देखील व्यावहारिक नाही.
तसेच अजून या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांमध्ये स्पर्धा नसल्यामुळे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागते. त्यामुळे सध्या तरी इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार टाळणेच योग्य ठरेल.