Ahmednagar News : पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलावातून पठार भागातील गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम तातडीने थांबवावे व प्रवरेच्या फेर वाटपाप्रमाणे मुळा खोऱ्याच्या पाण्याचेही फेरवाटप करण्यात यावे,
या मागणीसाठी पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समितीच्या वतीने सुमारे तीन तास कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सुगाव बुद्रुक फाट्यावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अकोले तालुक्यातील मुळा विभागातील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलावातून पाणी सोडू नये, त्यातून पाईपलाइन नेली जाऊ नये, यासाठी मुळा विभागातील अनेक गावांच्या नागरिकांनी सुगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळालच पाहिजे, यासाठी मुळा विभागातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. लहित, लिंगदेव, कोतुळ, पिंपळदरी, चास, शिदवड फाटा, पिंपळगाव खांड, बोरी, वाघापुर व अनेक गावांनी या रास्ता रोकोत सहभाग नोंदवला.
या रास्ता रोकोमुळे कोल्हार -घोटी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून जर पाईपलाईन करणार असाल, तर याद राखा अन्यथा पाईपलाईन केली, तर तिचे नुकसान करण्यात येईल, असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे.
यावेळी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रवरेच्या पाण्याच्या फेरवाटपाप्रमाणे मुळा खोऱ्यातील हरीशचंद्र गड ते मुळा धरणाच्या टेलपर्यंत आमच्या हक्काचे पाणी किती आहे ते आम्हाला मोजून द्यावे, त्यासाठी आम्ही औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलावातून या पाणी योजनेस पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे का? असा सवाल बी. जे. देशमुख यांनी जलसंपदाचे उपअभियंता हारदे यांना केला. त्यावर हारदे यांनी ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे पाणी उचलण्याची परवानगीची गरज नाही किंवा स्थानिक आमदारांच्या ना हरकतीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सीताराम देशमुख, भाजपचे कार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख, अॅड. सदानंद पोखरकर, चासचे माजी सरपंच बाळासाहेब शेळके, संपतराव पवार, लिंगदेवचे जालिंदर कानवडे,
डी बी फापाळे, ज्येष्ठ नेते प्रभाकरराव फापाळे, अमित घोमल, लहीतचे एस के चौधरी, रमेश गोडसे, विवेक चौधरी, भाजप महिलाध्यक्षा रेश्मा गोडसे, वाघापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती लांडे, माजी सरपंच बाळासाहेब रंधे, सरपंच गाडेकर आदींनी मनोगते व्यक्त केली.
आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य रमेशराव देशमुख, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रकटे, चासचे उपसरपंच सचिन शेळके, गणेश शेळके, विक्रम शेळके, मारुती रंधे, अण्णासाहेब रंधे, भाऊसाहेब हाडवळे, मनोज देशमुख,
संजय साबळे, सुनील चौधरी, अर्जुन गावडे, राहुल गोडसे, दगडू हासे, गंगाराम शेटे, विकास शेटे, नारायण डोंगरे, रोहिदास भोर, विनोद देशमुख, लहाणू चौधरी, वर्षा चौधरी, लहीतच्या सरपंच चौधरी आदी उपस्थित होते.