Ahmednagar News : पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करू टँकर, चाराडेपो व रोजगार हमीचे कामे सुरु करावीत, अशी मागणी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे केली आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर न केल्यास वसंतराव नाईक चौकात आमरण उपोषणाचा इशारा दौंड यांनी दिला आहे.
मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड व त्यांचे सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद ते व तहसिलदार शाम वाडकर यांची भेट घेतली.
या वेळी बोलताना दौंड म्हणाले, यावर्षी पाऊस कमी पडला. खरीप हंगामाची पिके वाया गेली. काही ठिकाणी रब्बीच्या पेरण्या झाल्या तर काही पेरण्यादेखील झालेल्या नाहीत. पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा, रोजगार, हे प्रश्न गंभीर बनले आहेत. राज्य सरकराने पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता.
राज्यातील काही सधन तालुके दुष्काळाच्या यादीत आलेले आहेत. पाथर्डी- शेवगावमध्ये पाऊस कमी असल्यामुळे पिके वाया गेली. तेच तालुके सरकारच्या यादीत आलेले नाहीत.
सरकारने नेमके कोणते निकष लावले हे समजायाला मार्ग नाही. महसुलचे अधिकारी जे उत्तर देतात ते तांत्रीक आहे.. दुष्काळाची परिस्थिती असताना सवलती मिळत नसतील तर मग सरकारचा उपयोग तरी काय.
सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. पाथर्डी-शेवगाव तातडीने दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर करावेत अन्यथा २२ नोव्हेंबर २०२३ रोजी वसंतराव नाईक चौकात आमरण उपोषण करू असे दौंड म्हणाले.