Maharashtra News : सन १९८५ ला जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा स्व. बबनराव ढाकणे यांनी मला बोलवून घेत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती. हे मी कधीही विसरू शकणार नाही.
विधिमंडळात काम करताना त्यांचे मार्गदर्शन नेहमी मला लाभले. त्यांच्या प्रखर भाषणांमुळेच मी भारावून जायचो, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मंगळवारी आ. थोरात यांनी अॅड. प्रतापराव ढाकणे यांची भेट घेऊन ढाकणे कुटुंबाचे सांत्वन केले. या वेळी सौ. प्रभावती ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, कृष्णा राजळे, राहुल राजळे, शिवशंकर राजळे, सिद्धेश ढाकणे,
नासीर शेख, दिगंबर गाडे, भगवानराव बांगर, योगेश रासने, चंद्रकांत भापकर, सविता भापकर, प्रकाश शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी आ. थोरात म्हणाले, आजकाल राजकारणाची पातळी ढासळते आहे. पक्षीय बंधनांपुढे राजकारणात वैयक्तिक संबंधाला मर्यादा येत आहेत. मात्र, जुन्याकाळी असे नव्हते, मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी बबनराव ढाकणे यांनी नगर जिल्ह्यातला एक तरुण विधिमंडळात पोहोचला म्हणून मला बोलावून घेऊन माझे अभिनंदन केले होते.
त्या कौतुकाने मला ऊर्जामिळाली. स्व. ढाकणे विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांची जनसामान्यांबाबत असलेली तळमळ विधिमंडळात आम्ही पाहायचो. त्यातून प्रेरणा घेत मी माझ्या मतदारसंघात काम करायचो, एक काळ असा होता की नगर जिल्ह्यातील सर्व आमदार अधिवेशन काळात सोबत जेवण करायचे. आज मात्र भेटसुद्धा टाळतात.
ही राजकीय परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. बबनराव ढाकणे यांनी मला नेहमीच चांगली वागणूक दिली. माझ्याशी बोलताना त्यांचा नेहमी गोडवा जाणवायचा. पक्षीय राजकीय बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांनी माझ्याशी कायम सौदार्य राखले.
त्यांची एकूण राजकीय कारकीर्द समृद्ध झाली. विधिमंडळात आजही जाववंतराव धोटे व बबनराव ढाकणे यांचे नाव लोकांसाठी आक्रमक पवित्र घेणारे नेते म्हणून घेतले जाते, असे ते शेवटी म्हणाले.