अहमदनगर शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी आली आहे. शहरातील एका ज्वेलरी शॉपमध्ये लुटमारीची घटना घडली आहे. शहरातील वर्मा ज्वेलर्स दुकानातील चोरीची घटना ताजी असतानाच आता नगर शहरातील कल्याण ज्वेलरी शॉपमधून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घ डली आहे.
सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पूजा शाम जगताप (वय 33 वर्ष) यांनी याबाबत तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. पूजा जगताप या कल्याण ज्वेलरी शॉपमध्ये कामास आहेत. 6 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास काळा बुरखा घातलेल्या दोन महीला दुकानात आल्या.
सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी विविध दागिने पाहिले. याचवेळी त्यांनी 2 लाख रुपये किमतीचा नेकलेस व 1 लाख रुपयांचा डायमंड चोरून नेला. दुकानातील स्टाफने जेव्हा सोन्याची मोजणी केली तेव्हा हा मुद्देमाल चोरून नेल्याची खात्री झाली.
स्टाफने यावेळी आजूबाजूस या महिलांचा शोध घेतला. परंतु त्यांचा काही तपास लागला नाही. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन दिवाळीच्या हंगामात ही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याबाबत काहीतरी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सध्या होत आहे.