Ahmednagar News : मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्याने सुरु आहे. दिवाळी निमित्त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध गावांमध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. राहाता शहरातही आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार विखे पाटील यांनी साखर वितरण करुन,
उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. गणेश परिसरातील ऊस उत्पादकांना २७०० रुपये भाव दिल्याबद्दल तसेच ५ कि.लो साखरेची भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांची लाडूतुला करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले की, गरीबांसाठी काम करण्याची शिकवण आणि संस्कार पद्मश्री आणि खासदार साहेबांनी दिला. तोच वारसा ना.विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेवून जाण्याचे काम विखे पाटील कुटूंबिय करीत आहे.
संकटात आणि आनंदात सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यातूनच कर्तृत्व आणि कर्तव्य सिध्द होते. सामाजिक उपक्रमातून राजकारण नव्हे तर, सामाजिक बांधिलकी आम्हाला जोपासायची आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र ज्यांना साखर मिळाली त्यांना काहीजन आता भेटतील सुध्दा अशा भेटणा-यांना विखे पाटलांची साखर कडू लागेल. आम्ही मात्र गोड साखर दिली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
निळवंड्याचे श्रेय ज्यांना घ्यायचे त्यांनी जरुर घ्यावे, मात्र हे पाणी आल्याने समृध्दी आणण्याचे काम होणार आहे. भविष्यात अजुनही काही कामे पुर्ण करायची आहेत. संस्थाच्या निवडणूका होतात, जय पराजय होतात परंतू गणेशच्या पराभवाने कुठलाही संदेह आपल्या मनात नाही.
विकासाच्या राजकारणामुळे जनता सोबत असल्याचे समाधान आहे. मतदार संघातील महिलांना पंढरपुर आणि तुळजापुर ही घडविलेली तिर्थयात्रा यशस्वी झाली. याचा सर्वाधिक आनंद मला झाला.
आता मुस्लीम महिलांसाठी अजमेरच्या यात्रेचे नियोजन आपण करणार आहोत. अनेक गावांमध्ये आज रेशनकार्ड तसेच विविध योजनांपासून लाभार्थी वंचित आहेत. त्यासाठी विशेष मोहीम राबवून योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सुजय विखे पाटील म्हणाले.