Shirdi News : श्री.साईबाबा संस्थान मधील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व निर्णयांबाबत शासनाच्या विधी व न्याय विभाग आणि संस्थान स्तरावर तातडीने कार्यवाही सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संस्थान मधील ५९८ कंत्राटी कर्मचारी मात्र संस्थानचा २००४ चा नवा कायदा अस्तित्वात येण्यापुर्वीपासून कार्यरत आहेत. मात्र अद्याप या कर्मचा-यांना सेवेत कायम न केल्यामुळे या संदर्भात अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करीत आहेत.
याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवून कर्मचा-यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. यापुर्वी सुध्दा १०५२ कर्मचा-यांना अशाच पध्दतीने पाठपुरावा करुन, सेवेत कायम करुन घेण्याचा निर्णय झाला होता.
उर्वरित ५९८ कर्मचा-यांच्या बाबतीत सुध्दा आता सकारात्मक विचार होण्याच्या दृष्टीने ना.विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मंत्रालयात विधी न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री.कलौटी,
शिर्डी संस्थाने उपमुख्य कार्यकारी आधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या उपस्थितीत बैठक घेवून संस्थान कर्मचा-यांच्या विविध मागण्यांबाबत विधी व न्याय विभाग तसेच संस्थान स्तरावर कालबध्द कार्यवाही करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
या सर्व कर्मचा-यांना कायम सेवेत घेण्याबाबत सेवाप्रवेश नियमांसह सुधारित आकृतीबंध निश्चित करणे, कर्मचा-यांची सेवाजेष्ठता निश्चित करणे तसेच कंत्राटी कर्मचा-यांना कायम सेवेप्रमाणे लाभ मिळावेत याबाबत विधी व न्याय विभाग आणि संस्थानच्या पुढाकाराने कार्यवाही करुन, लवकरच कर्मचा-यांना दिलासा मिळवून देवू अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे.