Maharashtra News : रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या शेती सिंचनाचे तातडीने नियोजन व्हावे, यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे संपूर्ण तालुक्याची खरीप पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. संपूर्ण तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या खाईत सापडलेला आहे.
तालुक्यातील गोदावरी डाव्या उजव्या कालव्याचे पाणी गावांना मिळते. त्या गावांना या दुष्काळातून सावरण्यासाठी रब्बी आवर्तनाचे तातडीने नियोजन होणे गरजेचे आहे. इतर जिल्ह्यातील धरणांवरील कालवा सल्लागार समितीच्या बैठका होऊन शेती सिंचनाला किती आवर्तनात किती पाणी देणार याचे नियोजन झालेले आहे.
परंतु, एकमेव गोदावरी डाव्या उजव्या कालव्याची कालवा सल्लागार समितीची अद्याप बैठक झालेली नाही.कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. अत्यल्प पर्जन्यमान असून तालुका दुष्काळाच्या यादीत बसला नाही.
दुसरीकडे पाणी नसल्याने हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक होण्याची सूचना आपण करावी, अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामाकडे लागल्या आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात अडचणी येत असून त्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.