खा. विखेंना शह देण्यासाठी आ. लंके यांची मोठी खेळी ! दिवाळी फराळाच्या निमित्ताने केलय मोठं प्लॅनिंग

Ahmednagarlive24 office
Published:

लोकसभा जसजशी जवळ येऊ लागली तसतसे अहमदनगर मधील राजकारण विविध रंग दाखवू लागले आहे. जिल्हाभरातील एक राजकीय गणित जिह्याचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे दक्षिणेकडे खा. सुजय विखेंविरोधात आ.निलेश लंके यांची राजकीय फाईट. आ. लंके हे दक्षिणेतील लोकसभेचे उमेदवार असतील व विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी राजकीय गणिते मागील काही दिवसांपासून आखली जात आहेत. दरम्यान आ. लंके यांनी या दृष्टीने अनेक राजकीय पावले देखील टाकायला सुरवात केली आहे.

 दिवाळी फराळाच्या निमित्ताने मातब्बर एकत्र :- आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आ. लंके यांनी मोठे राजकीय गणित आखले आहे. येत्या १६ नोव्हेंबरला हंगा येथे दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे नगर शहरासह नगर लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सेवा संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक व इतर प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून निमंत्रण दिले आहे. फराळाचे निमित्त असले तरी ही संपूर्ण तयारी लोकसभा उमेदवारीचीच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हे एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन आहे हे वेगळे सांगायला नको.

 आ. रोहित पवारांना खास आमंत्रण :- खा. विखे पाटील यांना आगामी लोकसभा निडणुकीत टक्कर देण्यासाठी आ. लंके यांनी शक्ती पणाला लावली आहे. विशेष म्हणजे ते अजित पवार गटात असूनही ते शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असतात. या दिवाळी फराळाला शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनाही खास आमंत्रण देण्यात आले आहे. या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार रोहित पवार यांना आ. निलेश लंके यांचे ‘खास’ व पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पवार यांनी तेथे जाऊन दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत दोन्ही पवारांकडून आ. लंके यांचे नाव फिक्स असल्याच्या चर्चांना स्पष्टोक्ती मिळत आहे.

 कार्यकर्ते पिंजून काढतायेत नगर लोकसभा मतदारसंघ :- खा. विखे पाटील यांना आगामी लोकसभा निडणुकीत टक्कर देण्यासाठी पवार कुटुंबिय आमदार लंके किंवा त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत.त्यामुळे आता जवळपास २०० कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नगर लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन दिवसापासून पिंजून काढत दिवाळी फराळाचं आमंत्रण गावागावात जाऊन देण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe