Corona News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. चिनी तज्ज्ञांनी देशात हिवाळ्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. कोरोनाच्या लाटेची शक्यता पाहता सरकारने वयोवृद्ध व संवेदनशील लोकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.
चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनामुळे २४ जण दगावले. गत महिन्यात कोरोनाचे २०९ गंभीर रुग्ण आढळले होते. या सर्व कोरोनाग्रस्तांना विषाणूच्या एक्सबीबी व्हेरिएंटच्या विविध उपप्रकारांची लागण झाली आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते, असा इशारा चीनचे आघाडीचे श्वसन रोगतज्ज्ञ झोंग नानशन यांनी दिला. शेंझेनच्या सरकारी रुग्णालयाचे अध्यक्ष लु होंगझू यांनी कोरोना विषाणूत सातत्याने उत्परिवर्तन होत असल्याचे सांगितले.
कोरोना विषाणूचे स्वरूप बदलत असल्याने लोकांची या विषाणूविरोधात लढण्याची क्षमता घटत चालली आहे. हिवाळ्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. रुग्णसंख्यावाढीची शक्यता अधिक आहे, असे होंगझू म्हणाले.
लु होंगझु यांनी कोरोना लाटेच्या संभावित धोक्यापासून सावध राहण्याची गरज व्यक्त करतानाच, घाबरून जाण्याची गरज नाही असेही सांगितले. लोकांनी घाबरू नये आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असा सल्ला होंगझू यांनी दिला.
कोरोनाचा पहिला रुग्ण २०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वूहानमध्ये आढळला होता. यानंतर कोरोना महामारीने जगाला विळखा घातला. कोरोनाने जगात हाहाकार माजवला. कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.
या विषाणूने लाखो लोकांचा बळी घेतला. वूहानच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला असल्याचा आरोप करण्यात आला; परंतु चीनने सातत्याने हा आरोप फेटाळला आहे.