Maharashtra Politics : लोकसभेच्या किती जागा लढवणार ? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…

Published on -

Maharashtra Politics : येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘इंडिया’तून राज्यात १२ ते १५ जागा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यातील जागावाटपाची चर्चा वेग घेईल आणि त्यातून चित्र स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे ‘इंडिया’ची जागावाटपाची चर्चा काहीशी थांबली असली, तरी निवडणूक निकालानंतर आम्ही कामाला लागू.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १२ ते १५ जागांवर लढण्यासाठी तयार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आमचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत.

बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे यांची नावे जवळपास निश्चित आहेत. रावेर, सातारा, कोल्हापूर, दिंडोरी, बीड आदींसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहोत. लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही आमची तयारी सुरू आहे.

त्यासाठी उमेदवारांची निवड करून त्यांना पक्षात घेतले जात आहे, असेही पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर निधीवाटपात अन्याय होत असेल, यावर विश्वास बसत नाही.

विकास निधीचे वाटप हा सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणाला किती निधी दिला जातो, याबद्दल काही सांगता येत नाही. निधी वाटपाबाबत आजकाल वेगळे पायंडे, प्रथा पडत आहेत. प्रत्येकालाच आपल्या मतदारसंघात जास्त निधी हवा असल्याचे दिसून येते, असे पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News