Ahmednagar News : महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत साचलेल्या कचऱ्याला सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा आग लागली. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. बुरूडगाव कचरा डेपोत यापूर्वी आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पुन्हा आग लागली. कचरा डेपोमध्ये लैंडफिल साइटवर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे.
तसेच प्रक्रिया न झालेल्या कचऱ्याचेही मोठे ढिगारे साचले आहेत. काल लागलेली आग ही फटाक्यांमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दिवाळीचे निमित्त साधून मागील वेळीप्रमाणे याहीवेळी जाणीवपूर्वक आग लावली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कचरा डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने महापालिकेला नोटीस बजावली होती.
त्यामुळे ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. दरम्यान, आग लागल्याच्या घटनेची चौकशी केली जाईल, असे आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.