पीक विम्याच्या ९६५ कोटींचे वाटप

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसानभरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत.

यापैकी ९६५ कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी दुपारी मंत्रालयात पार पडली. यात कृषी विभागाकडून पीक विम्याबाबत सादरीकरण करण्यात आले, त्यात वरील माहिती दिली.

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता १२ जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून ९ जिल्ह्यांमध्ये अंशतः आक्षेप आहेत.

राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा ९ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ १ रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण ८ हजार १६ कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आल्याची माहिती कॅबिनेटमध्ये देण्यात आली.

रब्बीसाठी ज्वारीची ४५, तर हरभऱ्याची २६ टक्के पेरणी

राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या ८६ टक्के पाऊस (९२९ मिमी) झाला. रब्बीसाठी ५८ लाख ७६ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आतापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे.

गतवर्षी याच सुमारास १३ लाख ५० हेक्टर पेरणी झाली होती. यावर्षी १५ लाख ११ हेक्टर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून १७ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीच्या ४५ टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २१.५२ लाख हेक्टर असून यावर्षी ५.६४ लाख हेक्टर म्हणजेच सरासरीच्या २६ टक्के पेरणी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe