Maharashtra News : दुष्काळी भाग,मुरबाड जमीन आणि मजुरांची कमतरता असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्व. कारभारी दादा गिते यांनी अतिशय देखणी आणि दर्जेदार टोमॅटो आणि कांदा शेती उभी केली.
तोच वारसा पुढची पिढी सक्षमपणे चालवीत आहे. तरुण शेतकरी वर्गाने आतापासूनच नियोजन करून आपला शेतमाल देशभर कसा पोहचेल, याचे नियोजन करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथे कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानमार्फत आयोजित ‘कृषी विज्ञान पुरस्कार’ प्रदान सोहळा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार थोरात बोलत होते.
आमदार थोरात म्हणाले, आताच्या तरूण शेतकऱ्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करून सर्वांनीच आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी. त्यासाठी स्व. कारभारी दादा गिते यांचा आदर्श घ्यावा.
आमदार खोसकर म्हणाले, कृषी विज्ञान पुरस्कार देऊन प्रगतिशील आणि कष्टाळू शेतकरी, शेती विषयी संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांना समाजापुढे आणल्याने तरुण वर्गाचा शेतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल.
हरिगाऊ गिते यांनी आपल्या देशाच्या कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये होण्यासाठी शेतीचे निव्वळ उदरनिर्वाहचे स्वरूप बदलून तिला व्यापारी स्वरूप यायला हवे, असे मत व्यक्त केले.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कुलगुरू डॉ. शरद गडाख, आदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ, शेती निगडित सेवांसाठी काव्या ढोबळे- दातखिळे यांना कृषी विज्ञान पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक डॉ. एल. के. गिते यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत घुले यांनी केले.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, तुकाराम गुंजाळ, काव्या दातखिळे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, लक्ष्मणराव कुटे, पांडुरंग केदार, सुभाषराव सांगळे, गणपतराव सांगळे, नानासाहेब शिंदे, विनायक सांगळे, किसन सुपेकर, सुदाम सानप, मोहन काकड, राजेंद्र सानप, मोहन गोडसे, अविनाश लोखंडे,
प्रशांत देवरे, संतोष घुगे, सुरेंद्र वानखेडे, राजेंद्र निनाळे, शामराव उगले, अजय मुंढे, अँड. विजय ढाकणे, पुंजाभाऊ सांगळे, भगवान इलग, प्रतिक मोरे, शंकरराव आव्हाड, अमृतवाहिनी सहकारी बँकेचे संचालक भाऊसाहेब गिते,
कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. एल. के. गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, बाळासाहेब गिते यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.













