Marathi News : पुणे शहराची ओळख केवळ उद्योगनगरी एव्हढ्यावरच सिमित न राहता आयटी हब म्हणून ओळख निर्माण होत आहे. दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक होणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.
शहराचा झपाट्याने विकास होत असतानाच जागेसह घरांचे भाव आकाशाला भिडले आहेत. यातूनच शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या च-होली, मोशी परिसरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. याठिकाणी मोठमोठे प्रकल्प निर्माण झाले असून अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे.
या प्रकल्पांना नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. गृहप्रकल्पांसह प्रश्नाकडून अनेक विकासप्रकल्प प्रस्तावित असल्याने, छोट्या-छोट्या गावांना जोडणारे सुसज्ज रस्ते आणि काही अंतरावर असणारे आळंदी देवस्थान यामुळे दिघी, च-होली येथे गृहप्रकल्प साकारले जात आहेत. शिवाय घरांच्या किमती आवाक्यात असल्याने येथे घरांची मागणीही वाढत आहे.
काही वर्षांपूर्वी दिघी चहोली परिसर म्हणजे आऊटसाईड परिसर समजला जात होता, परंतु गत काही वर्षात परिसरात झपाट्याने विकास झाला, रस्ते तयार झाल्याने थेट कनेक्टिव्हीटी वाढली आणि याठिकाणी स्थायिक होण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. या भागांमध्ये सध्या सर्वाधिक गृहप्रकल्प उभारले जात आहेत.
अगदी वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंत सदनिका उपलब्ध होत आहेत. गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे सामान्य कामगारांपासून आयटी इंजिनियरपर्यंत आणि शिक्षकांपासून व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी घरांसाठी पसंती दिली आहे.
काही प्रकल्प व्यापारी संकुलांसह निवासी स्वरूपातीलही आहेत. त्यामुळे घर आणि दुकाने अशी दुहेरी सोय होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन अशा सुविधा दिल्या जात असून उच्चभ्रू जीवनशैली नावारूपाला येत आहे.
चिखलीपासून मोशीपर्यंत आणि मोशीपासून डुडुळगाव आळंदीपर्यंत देहू-आळंदी रस्त्यालगत नवे मार्केट उभे राहिले आहे. जीवनावश्यक किराणा मालाच्या दुकानांसह फर्निचर मॉल्स जागोजागी आहेत.
फाटा ते गावापर्यंत, बुर्डेवस्ती, पठारे मळा, काळजेवाडी, वडमुखवाडी, चोविसावाडी सर्वच भागात इमारती उभ्या राहत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल उपकरणांची दुकाने आहेत.
सराफ, कापड, सौंदर्य प्रसाधने, होम डेकोरेटर इंटेरियर डिझाईन, वाहनांचे सुटे भाग मिळणारी दुकाने आहेत. दरवाजे, खिडक्या, ग्रील्स, पडदे असे सर्व प्रकारचे साहित्य या भागात मिळते. अनेक नामांकित शैक्षणिक संकुले उभी राहिली आहेत.
हॉटेल्स व उपहारगृहे आहेत. शिवाय, वन बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंतचे मनासारखे प्रत्येकाच्या बजेटमधील घरे इथे उपलब्ध आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेचे च-होली व बोऱ्हाडेवाडी मोशी येथील गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.