‘प्रवरे’ने आठ वर्षे गणेश परिसराची लूट केली, तेव्हा गप्प का होता ?

Updated on -

Ahmednagar News : गेली आठ वर्षे प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा २०० ते ३०० रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली. गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते?

असा सवाल गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी विचारला आहे. नऊ वर्ष सभासद, शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक करणाऱ्यांनी गणेश कारखान्याचा कळवळा असल्याचा खोटा आव आणू नये, असाही टोला लहारे यांनी गणेशचे तत्कालीन अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांना लगावला.

सुधीर लहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्यासमोर रोज अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच गणेशचे धुराडे पेटू शकले.

सभासदांचे आशीर्वाद होते, कामगारांची मेहनत होती म्हणून गणेश कारखाना सुरू झाला. साखर वाटून आम्ही त्यांचे तोंड गोड केले. गणेश कारखाना हा संगमनेर आणि संजीवनीप्रमाणे भाव देईल, हे आम्ही अगोदरच सांगितलेले आहे.

प्रवरेवरून आदेश आला म्हणून भुई थोपटण्याचे उद्योग सदाफळ यांनी करू नये. गणेशच्या माध्यमातून आम्हाला राजकारण करायचे नाही. गणेश कारखाना सुरू होऊ नये यासाठी तुमच्या नेतृत्वाने केलेले प्रयत्न जनतेच्या दरबारात आम्हाला मांडायला भाग पाडू नका, असाही इशारा लहारे यांनी दिला.

लहारे यांनी पुढे म्हटले, सदाफळ यांनी माहिती घेऊन बोलायला हवे. प्रवरा आणि गणेश कारखान्याच्या भावातली तफावत त्यांनी समजून घ्यायला हवी होती. २०१४-१५ मध्ये प्रवरेने २१५५ रुपयांचा भाव दिला तर गणेशच्या उत्पादक सभासदांना १९२४ रुपये मिळाले. २०१५-१६ मध्ये प्रवरेचा भाव २२४५ रुपये तर गणेश युनिटचा भाव २०३९ रुपये होता.

सदाफळ यांनी गणेश उत्पादकांच्या हितासाठी प्रवरेच्या नेतृत्वाला एकदा तरी जाब विचारला का? गणेश कारखान्यावर कर्ज नाही, असे ते म्हणत असतील तर मग प्रवरा कारखाना ८२ कोटी रुपये कशाचे मागतो आहे?

गणेश कारखान्यातून राहुरी कारखान्याला पाच कोटी रुपये नेमके कशाचे दिले? गणेश कारखान्याचे बॉयलर आणि इतर मशिनरी परस्पर का पळविली गेली? मोलेसेस किंवा साखरेचा एकही दाणा कारखान्यात का शिल्लक राहिला नाही?

जीएसटी आणि इतर शासकीय देणे का थकविले गेले? राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या शेअर्सच्या रकमा परस्पर का मोडल्या? गणेश कारखान्यात आठ वर्षांत काय घडले हे माहीत नसेल तर सदाफळ हे फक्त सह्या करण्यापुरते अध्यक्ष होते, असा अर्थ होतो, अशी टीका त्यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe