Maharashtra News : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकत्यांची माजीमंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन चर्चा केली. याप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरू असून लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आ. शिंदे यांनी या वेळी केले.
दरम्यान, धनगर आरक्षण अंमलबजावणीची ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचा निर्धार या वेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यांपूर्वी तब्बल एकवीस दिवसांचे आमरण उपोषण केले.
त्यावेळी महाराष्ट्र सरकारने पन्नास दिवसांत अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही, त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली.
उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले आणि सुरेश बंडगर यांची आज माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी भेट घेऊन विचारपूस केल्याचे सांगितले. तर आ. शिंदे यांनी धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या कार्यवाहीसंदर्भात शासनपातळीवर हालचाली सुरु असून, लवकरच सकारात्मक कृती झालेली दिसेल, अशी ग्वाही या वेळी दिली.
या वेळी उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, प्रदेश सचिव नितीन धायगुडे, प्रदेश मिडीयाप्रमुख स्वप्निल मेमाणे, शशिकांत तरंगे, संतोष कुरडूले, समाधान पाटील, किरण धालपे, दत्ता काळे, संतोष कोल्हे, बाळा गायके, आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.