Ahmednagar News : अकोले एसटी आगाराचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकतेच कसारा गाडी शेंडी येथे बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या प्रवाशांना न घेताच निघून गेली. प्रवाशांनी अकोले आगाराच्या कारभाराचा निषेध केला आहे.
अकोले येथून कसाऱ्याला जाण्यासाठी रोज दुपारी ४ वाजता नियमित बस सुटते. ही ४५८४ क्रमांकाची बस शनिवारी (१८ नोव्हेंबर) नियमित आगारातुन सुटल्यानंतर राजुरमार्गे शेंडी येथे ५ वाजुन ४० मिनिटांनी शेंडी येथे पोहचली.

सध्या दिवाळीच्या सुट्टीच्या कारणास्तव माहेरी तसेच सासरी जाण्यासाठी अनेक लेकी व सुना ये-जा करत आहेत. त्यातच या लेकी-सुनांकडून प्रवासासाठी अगोदर पसंती लालपरीला दिली जाते. त्यातच महिलांना तिकीटाचा दर कमी असल्याने अनेक महिला प्रवासी लालपरीचीच वाट पाहात असतात.
शनिवारीही अशाच अनेक महिला कसारा गाडीची वाट पाहत शेंडीच्या मुळ बसथांबा असलेल्या प्रवरा चौकात वाट पाहत होत्या; पंरतु या गाडीचा चालक व वाहकांनी प्रवाशांची दिशाभुल करत बस थांब्यावर न नेता परस्पर निघुन जाणे पसंत केले.
चालक व वाहकाला गाडी बसथांब्यावर न नेण्याचे कारण विचारले असता, अकोले आगारप्रमुख व राजुर बसस्थानक प्रमुख यांनीच आम्हाला बाहेरुन जाण्यास परवाणगी दिली आहे, असे सांगत गाडी घेऊन निघुन गेले.
ही गाडी बाहेरुनच रोडवरुन निघुन गेल्याने कसाऱ्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बसथांब्यावरच ताटकळत उभे राहावे लागले. शेवटी नाइलाजास्तव त्यांना खासगी वाहनांना जास्तीचे पैसे मोजुन कसाऱ्याला जावे लागले.
चालक व वाहकाच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना फटका बसला असुन अकोले आगाराचा त्यांनी निषेध केला आहे. अकोले आगाराच्या बस मोठ्या प्रमाणात शेंडीमार्गे घोटी, इगतपुरी व कसाऱ्यासाठी धावत असतात.
त्यातच शेंडी हे गाव मोठी बाजारपेठ आहे. भंडारदरा हे धरणही शेंडी गावाच्या उशालाच असल्याने अनेक पर्यटक शेंडीला जाण्या येण्यासाठी परिवहन महामंडळाच पंसती देत असतात; पंरतु अकोले आगाराचे अनेक चालक व वाहक बसथांब्यावर शेंडीच्या गर्दीचे कारण दाखवत बाहेरुन जाण्यास प्राधान्य देतात.
त्याचा फटका मात्र अकोले आगाराला बसत आहे. शेंडीच्या बसथांब्यावर बस आणली जाऊन याच ठिकाणी प्रवासी बसमध्ये भरावेत, अशी मागणी प्रवाशांनी पहिवहन महामंडळाकडे केली आहे. शनिवारी प्रवाशांना बायबाय करणाऱ्या चालक व वाहकावर कारवाई करण्याची मागणी शेंडी परीसरातुन होत आहे.