Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कुख्यात वाळूतस्करी राज्यात परिचयाची. महसूल पथकावरील हल्ल्याच्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडली आहे.
वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर खालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ते सुदैवाने बचावले. प्रशांत सांगडे असे तहसीलदारांचे नाव असून डंपरचालक अन्वर बेग (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि स्कॉर्पिओ (क्र. एमएच १६ सीव्ही २३१३) चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अमरापूर जवळ घडली.
अधिक माहिती अशी : अमरापूर गावाजवळ वाळूची चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती तहसीलदार सांगडे यांना मिळाली. त्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आपल्या खासगी वाहनातून अमरापूर येथील बस स्टॅण्ड चौकात येऊन थांबले.
वाळूने भरलेला डंपर तिसगावच्या दिशेने जाताना त्यांना दिसताच त्यांनी कारवाई सुरु केली. तहसीलदार सांगडे यांनी डंपरचा पाठलाग करत वाहन थांबवले. तहसीलदारांनी त्याच्याकडे चौकशी केली असता ही चोरटी वाहतूक सुरु असल्याची खात्री झाली.
तितक्यात तेथे एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्र. एमएच १६, सीव्ही २३१३) येऊन थांबली. त्या गाडीत डंपर गाडीचे मालक असल्याचे डंपरचालकाने सांगितले. तहसीलदारांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने डंपरचालकाला तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा इशारा केला.
डम्परचालकाने देखील थेट वाहन जोरात चालवून तहसीलदारां चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला उडाली मारल्याने ते बालंबाल बचावले. याचदरम्यान ते दोघेही तेथून फरार झाले.
* मागील काही दिवसात अनेक हल्ले
जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढत आहे. महसूलमंत्री यावर वचक ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु तरीही वाळू तस्कर या गोष्टींना जुमानत नसताना दिसत आहेत. यामुळे मागील काहीदिवसात या हल्ल्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसते.