Ahmadnagar Breaking : जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास नकार देणाऱ्या सुनेस मारहाण करणाऱ्या, मानसिक त्रास देणाऱ्या पती, सासू, नणंदेसह एका महिलेच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पीडित सून शुभांगी साईनाथ औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासू सुवर्णा विलास औटी यांचा दम्याचा आजार बरा व्हावा, नणंद भाग्यश्री विलास औटी हिचे लग्न जमावे,
घरासाठी भाडेकरू मिळावेत, यासाठी आपली सासू, पती व नणंद हे जादूटोणा करणाऱ्या उषा कळमकर (रा. घारगाव, कळमकरवाडी, श्रीगोंदे) या महिलेकडून गेल्या सात महिन्यांपासून अघोरी उपाय करून घेत आहेत.
या जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितल्याप्रमाणे उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास, तसेच तुळजापूरच्या देवीचे वारे घेण्यास आपण नकार दिला.
त्यामुळे आपणास सतत शिवीगाळ, मारहाण करण्यात आली, तरीही आपण अघोरी कृत्य करण्यास तयार नसल्याने सासू, पती आणि नणंदेने मारहाण करीत आपणास घराबाहेर काढून माहेरी हाकलून दिले.
११ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता पारनेर येथील राम मंदिर परिसरात माझ्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व तीन ग्रॅमची अंगठी हिसकावून घेतली.
देवऋषी उषा कळमकर हिच्या सांगण्यावरून सासू, पती व नणंदेने आपणास मारहाण, शिवीगाळ केली, तसेच मानसिक त्रास दिल्याचे शुभांगी औटी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार, पारनेर पोलिसांनी सुवर्णा औटी, साईनाथ औटी, भाग्यश्री औटी व देवऋषी उषा कळमकर यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.